अबोल प्रेमाची बोलकी गोष्ट 😊
काय रे अभिषेक अजून किती वेळ लावणार आहेस तू? लवकर ये ना आता. केव्हा पासून वाट बघतेय मी? तरी मी म्हणतच होते की गोव्याला तु एकटाच जाऊन ये. तु तुझ्या कामात व्यस्त असतो आणि इथे हॉटेल मध्ये एकटं राहून मला कंटाळा येतो. आता लगेच ये. सवानी ने हसतच फोन ठेवला.
सवानी आणि अभिषेक हे तसे बालपणाचे मित्र. लहानपणापासून ते सातत्याने सोबतच राहायचे. दोघेही तसे अबोल, शांत, मृदु स्वभावी, निर्व्यसनी आणि जिवाला जीव लावणारे. बालपण मागे पडत गेल आणि तरूणाई चे दिवस उजाडले. सवानी च्या वडिलांनी स्थळ शोधण्यास सुरुवात केली. पण तिला समजवून घेणारा, तिच्याशी न बोलता सुध्दा संवाद साधणार जोड़ीदार सापडेना. वर्ष उलटून गेलं. एका संध्याकाळी अभिषेक च्या आई ने सवानी ला घरी बोलावून घेतल. अभिषेक सुद्धा तिथे बसला होता. चहा झाला आणि डोळ्याची पापणी न हलवता अभिषेक च्या आई ने सवानी ला एक प्रश्न विचारला. अभिषेक सोबत लग्न करणार? सवानी ने अभिषेक कडे बघितलं. अभिषेक ने एक सौम्य हास्य दिलं आणि होकाराने मान डोलावली. सवानी करता इतकंच पर्याप्त होत. तिने अभिषेक च्या आईला लाजत होकार दिला. पुढल्या ६ महिन्यात थाटामाटात लग्न सुद्धा झालं. अभिषेक आणि सवानी यांच्या संसाराची एक गोड सुरुवात झाली.
काही वर्षे नौकरी करून, अभिषेक ने स्वतःचा व्यवसाय स्थापित केला होता. कामा निमित्त त्याला सतत बाहेरगावी जावं लागतं असे. बरेच वेळा तो सवानी ला सुद्धा सोबत घेऊन जायचा. या वेळेस गोव्याला जायचा योग आला होता. अभिषेक दुसऱ्यांदा गोव्याला आला होता. १५ वर्ष अगोदर अभिषेकच्या ऑफिस ची एक सहल गोव्याला आली होती. आषाढ महिना होता आणि त्यामुळे गोव्याच नैसर्गिक सौन्दर्य मनात साठवून ठेवण्या सारख होतं. रिमझिम पाऊस सातत्याने पडत होता. हॉटेलच्या खोलीला बाल्कनी होती. निसर्गरम्य गोव्याच आषाढ रूप त्या बाल्कनी मधून अजूनच मनमोहक दिसत होतं. सगळ्या मित्रांनी तिथेच घोळका केला. गप्पा रंगवल्या. दुपारी जेवायची वेळ झाली म्हणुन सगळे मित्र जेवायला निघाले. अभिषेक ला मात्र भूक लागली नव्हती. तो बाल्कनी मध्येच थांबला. समोरच एक टेकडी होती. पावसाळ्या मुळे त्या टेकडीवर जणू वन साम्राज्य निर्माण झालं होतं. मन मुग्ध करणारा निसर्ग समोर असून सुद्धा त्याच्या मनाची पूर्तता मात्र होत नव्हती. आपलं काहीतरी हरवलंय अस त्याला जाणवत होतं. नक्की काय ते त्याला देखील कळत नव्हतं. आपण परत गोव्याला यायचं आणि याच खोलीत राहून त्या हरवलेल्या वस्तूचा शोध घ्यायचा निर्धार त्याने केला.
अभिषेकच्या ऑफिस ची बैठक संपली. अभिषेक ला आज पर्यंतीची सगळ्यात मोठी ऑर्डर सुद्धा मिळाली. सवानी सोबत दूरध्वनी वरून संवाद साधत तो म्हणाला, "हो ग, आलोच आता १० मिनिटात. झालंय सगळं मनासारखं." अभिषेक आनंदी होता. तो हॉटेल मध्ये आला, खोलीचं दार उघडलं आणि पहिली दृष्टी पडली ती सवानी वर. खोलीच्या बाल्कनी चे दार तिने उघडे ठेवले होते. बाहेरचा निसर्ग ती मनात उतरवत होती. १५ वर्षा पूर्वी सारखाच रिमझिम आषाढी पाऊस आज सुद्धा पडतच होता. तीच खोली, तीच बाल्कनी, तीच टेकडी. सवानी ने मागे वळून बघितलं, किंचित हसली आणि परत पावसाकडे बघू लागली. अभिषेक तिच्या मागे जाऊन उभा राहला आणि तिला मिठीत घेत दोघे ही त्या पाऊसात भिजणाऱ्या टेकडी कडे बघू लागले. शांतता भेदत सवानी ने अभिषेक ला विचारला. अभिषेक, १५ वर्षा अगोदर पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? हो सवानी, १५ वर्षा अगोदर माझं मन तुझ्यात रमल होत. तु मात्र इथे नव्हतीस. तुझ्यात गुंतलेलं माझं ते मन हरवलं होत. सवानी हळूच हसली. मन जुळली की शब्दांची गरज नसते आणि शांततेला वाचा फुटते. अभिषेक आणि सवानी त्याच शांततेच्या सावलीत क्षितिजा कडे परत बघू लागले 😊
- संयोगी
Comments
Post a Comment